*स्वर्गीय राजाभाऊ पाथ्रडकर यांना, लायन्स परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली*
सुरेंद्र इखारे वणी :
“असा जन्म लाभावा, देह चंदन व्हावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा” — या शब्दांनी ओथंबलेल्या गंभीर वातावरणात लायन्स क्लब वणी, वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, तसेच वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वर्गीय राजाभाऊ पाथ्रडकर यांना देशमुखवाडी, येथील लायन्स स्कूल येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेच्या प्रारंभी त्यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्रध्दांजली सभेच्या अध्यक्षस्थानी लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार लायन संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. त्यांनी, “राजाभाऊ म्हणजे माणुसकीचा सुवास! त्यांनी आयुष्यभर सेवा, शिस्त, आणि स्नेह यांचा संगम साधला. त्यांच्या योगदानाचे स्मरण करताना अभिमान वाटतो. राजाभाऊ हे केवळ त्यांच्या कुटुंबीयांचेच नव्हे तर संपूर्ण लायन्स परीवाराचे आधार स्तंभ होते त्यांची अनुपस्थिती आम्हां सर्वांना जाणवते ” असे हृदय मनोगत व्यक्त केले.
तसेच लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष लायन तुषार नगरवाला यांनी आपल्या श्रद्धांजलीपर मनोगतात, “राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी संघटनेचा अर्थ शिकला. त्यांची नम्रता, संयम, कार्यतत्परता आणि सकारात्मकतेचा गंध आजही आमच्यात दरवळतो ” असे सांगितले. लायन्स ट्रस्टचे उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर, लायन महेन्द्र श्रीवास्तव, संस्थापक सदस्य दत्तात्रय चकोर, डॉ विजय राठोड,किशन चौधरी, प्रशांत गोडे, चित्रा देशपांडे
यांनीही शोक संवेदना व्यक्त केल्या.या श्रद्धांजली सभेला लायन्स क्लब व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सदस्य लायन प्रमोद देशमुख, रमेश बोहरा, पुरुषोत्तम खोब्रागडे, नंदलाल शुगवानी,यश श्रीवास्तव, शिक्षकवर्ग, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तेंव्हा डोळ्यांच्या कडा पाणावल्या. राजाभाऊंच्या साध्या, सतत कार्यरत व नि:ष्काम आयुष्याने अनेकांना प्रेरणा दिली.
प्रत्येकाच्या मनात राजाभाऊंचा हसरा चेहरा, त्यांचा सेवाभाव, आणि त्यांच्या बोलण्यातून जाणवणारा आत्मीयतेचा स्पर्श दरवळत होता. शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या आत्म्याच्या चिरशांतीसाठी प्रार्थना केली.सभेचे संचालन किरण बुजोणे यांनी केले.
सभागृहात शांतता आणि पुन्हा एकदा तीच भावना दाटून आली —”गंध संपला तरी, सुगंध दरवळत राहावा…”




