अभाविपच्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सुरेंद्र इखारे वणी : – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) स्थापना दिनानिमित्त वणी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रत्येक शाळेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी पंचायत समितीचे सभापती तथा ब्लॅक डायमंड स्कूलचे संचालक संजय पिंपळशेंडे होते. प्रमुख वक्ते म्हणून यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून वणी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी गजानन कासावार उपस्थित होते. तसेच अभाविप वणी शाखेचे उपाध्यक्ष चैतन्य तुरुविले व नगरमंत्री आयुषी पुलेनवार व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून गजानन कासावार यांनी या यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचा उद्देश विषद करून विद्यार्थ्यांच्या संघटनेने विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हा खऱ्या अर्थाने गुणवंतांचा सन्मान असल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख वक्ते डॉ. नितीन खर्चे यांनी अभाविपच्या कार्याचा आढावा घेताना, राष्ट्रपुनर्निर्माणाच्या कार्यात विद्यार्थी परिषदेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. योगशास्त्र हा भारताचा अमूल्य ठेवा असून त्याचे महत्त्व जगाने स्वीकारल्यानंतर आपणही त्याकडे नव्या दृष्टीने पाहू लागलो, असे ते म्हणाले.
देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर अभाविपने सातत्याने भूमिका घेतली असून बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची मागणीही अभाविपने सातत्याने लावून धरली होती. दहशतवादाच्या छायेत असताना श्रीनगरच्या लाल चौकात १९९० साली अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा फडकावून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला, असे त्यांनी नमूद केले.
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व अनियमिततेविरोधात अभाविपने वेळोवेळी आंदोलन केले असून भारतीय ज्ञानपरंपरेचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तंत्रशिक्षण, कृषी, वैद्यकीय, औषधनिर्माण, आदिवासी विद्यार्थी तसेच सेवा क्षेत्रात विविध प्रकल्पांद्वारे कार्य सुरू असून राष्ट्रभक्त युवक घडविणे हेच अभाविपचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात संजय पिंपळशेंडे यांनी समाजाला दिशा देणारे बुद्धिमान व संस्कारक्षम विद्यार्थी घडणे ही काळाची गरज असून अभाविप हे कार्य प्रभावीपणे करत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी बर्डे यांनी केले, तर नयन क्षीरसागर यांनी आभार मानले.





