अमित शहा प्रकरणावरून विरोधकांचा सभात्याग
नागपूर ( जयंत साठे ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शहा यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले होते, “आंबेडकर… आंबेडकर म्हणायची आता एक फॅशन झाली आहे. एवढं जर देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता.”
या विधानावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात, विधान परिषदेच्या सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी उडाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्ताधारी सदस्यांनी गोंधळ घातला आणि सभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांना बोलण्याची परवानगी नाकारली. यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
संसदेच्या दोन्ही सभागृहातही या विधानावरून प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी “अमित शाह माफी मांगो” आणि “जयभीम”च्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. विरोधकांनी अमित शहा यांना माफी मागण्याची मागणी केली आहे.
शहा यांनी आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे आणि काँग्रेसने अर्धवट विधान पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
या प्रकरणामुळे नागपूर अधिवेशनात वातावरण तापलेले आहे, आणि विरोधकांनी शहा यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी विविध आंदोलनांचे आयोजन केले आहे. या आंदोलनात शिवसेना ( उबाठा), काॅंग्रेस,व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शप.) चे आमदार उपस्थित होते.