▫️ “शाखा मजबूत झाल्या शिवाय संघटनेची ताकद वाढत नाही” – कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी
▫️कळंब तालुका अधिवेशन मेटीखेडा येथे संपन्न
▫️तालुका सचिवपदी कॉ. सदाशिव आत्राम यांनी पुनश्च निवड
सुरेंद्र इखारे वणी :- “कम्युनिस्ट पक्षात कष्टकऱ्यांच्या संघटनात्मक शक्ती ला खूप महत्त्व आहे.कारण कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण करायचे असेल तर कष्टकऱ्यांच्या संघटनेची फळी मजबूत असली पाहिजे.संघटना ताकदवान पाहिजे असेल तर शाखा मजबूत पाहिजेत. शाखेला ताकदवान बनवायचे असेल तर त्यात निरंतरता असली पाहिजे, त्यात जिवंतपणा येण्यासाठी सातत्याने कार्य सुरू पाहिजे. त्यासाठी शाखा सदस्यांनी वैचारिकता वाढविली पाहिजे”, असे आवाहन कळंब तालुका अधिवेशन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी केले.माकपचे कळंब तालुका अधिवेशन मेटीखेडा येथील कोलाम समाज चावडी येथे घेण्यात आले. या अधिवेशनात तालुका सचिव म्हणून कॉ. सदाशिव आत्राम यांची पुनश्च एकमताने निवड करण्यात आले.
या अधिवेशनाचे कामकाज अध्यक्ष मंडळ कॉ. रमेश मीरासे, कॉ. निरंजन गोंधळेकर व कॉ. कवडू चांदेकर यांनी पाहिले. सर्वप्रथम शहिदांना व पक्षातील तसेच पुरोगामीचळवळीतील नेते व कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यानंतर तालुका सचिव कॉ. सदाशिव आत्राम यांनी तीन वर्षाचा अहवाल मांडला. त्यावर अनेक कार्यकर्त्यांनी त्यावर आपली मते मांडली व त्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली.
या अधिवेशनात १३ सदस्यीय तालुका कमिटी निवडण्यात आली. त्यामधून कॉ. सदाशिव आत्राम यांची पुनश्च एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली.या अधिवेशनात कॉ. शामराव जाधव यांनी क्रांतिकारी गीते सादर करून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश जागविला होता. या अधिवेशनाला कळंब तालुक्यातील अनेक गावातील निवडक स्त्री पुरुष प्रतिनिधी यांनी भाग घेतला.