Saturday, May 16, 2026
Google search engine

मूल्यविरहितता सर्व समस्यांचे कारण – डॉ. संदीप ताटेवार

मूल्यविरहितता सर्व समस्यांचे कारण – डॉ. संदीप ताटेवार
सुरेंद्र इखारे वणी   :-   ” सुखी आणि समृद्ध होणे हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट आहे. त्यात कौशल्याच्या आधारे समृद्धी प्राप्त करता येते पण सुखी व्हायचे असेल तर मानवी मूल्यांना पर्याय नाही. समृद्धीच्या संग्रहातून सुखी होण्याची मनीषा हेच दुःखाचे कारण असते. सुविधा असायलाच हव्यात पण सुविधांच्या सोबत संबंध आणि योग्य समज यांचा समन्वय असेल तरच सुख प्राप्त होऊ शकते.” असे विचार अमरावती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. संदीप ताटेवार यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजित लोकनायक बापूजी अणे स्मृत्यर्थ आयोजित ५५ व्या वर्षीच्या व्याख्यानात “वैश्विक मानवी मूल्य काळाची गरज !” या विषयावर ते व्यक्त होत होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार उपस्थित होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक अनिल जयस्वाल, उमापती कुचनकार, सुरेश शुक्ल, प्राचार्य प्रसाद खानझोडे तथा औषधी निर्माण शास्त्र विभागाचे प्राचार्य सुधाकर रेड्डी हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी समाज माध्यमांमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा आपण नेमका आस्वाद घेऊ शकत नाही हे सांगत ,व्याख्यानात चैतन्याचा चैतन्याशी संबंध आहे म्हणत व्याख्यान परंपरा जोपासण्याचे महत्व अधोरेखित केले.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डॉ. ताटेवार यांनी मानवाच्या मूल प्रवृत्ती, प्रत्येक कार्याचा उद्देश, निरंतर सुख आणि समृद्धीचे उद्दिष्ट यांचे विवेचन करीत मानवी जीवनात आवश्यक असणाऱ्या नऊ मूल्यांचे विशेष विश्लेषण केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी व्याख्यानमालेच्या अखंडित आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागात अनेक दानदात्यांच्या देणग्यांमधून वितरित करण्यात येणाऱ्या विविध पारितोषिकांचे तथा जिल्हा, विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले यशाप्रीत्यर्थ बक्षीसांचे वाटप करण्यात आले. यात प्रज्वल काळे या विद्यार्थ्याने तब्बल १२ पुरस्कार पटकावले हे विशेष उल्लेखनीय.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मनोज जंत्रे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ .किसन घोगरे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular