*शुद्ध कर्माचरण हाच खरा धर्म- ह.भ.प. मकरंदबुवा हरदास*
सुरेंद्र इखारे वणी: येथील जैताई मंदिराच्या वासंतिक चैत्र नवरात्रात दि. ३१ मार्च रोजी नागपुरातील प्रसिद्ध कीर्तनकार व श्री दक्षिणामूर्ती मंदिर महाल येथील महंत भागवताचार्य ह.भ.प. मकरंदबुवा हरदास यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. पूर्वरंगपदासाठी बुवांनी ‘रूप पाहता लोचनी’ हे पद घेतले होते. ‘रूप’ आणि ‘सुख यांची सांगड घालून सांख्य दर्शनाचा सिद्धान्त स्पष्ट करून त्यावर आधारित संतांचे दृष्टान्त बुवांनी उलगडलेत. पारमार्थिक व शाश्वत सुखासाठी शुद्ध कर्माचरण अत्यंत आवश्यक असल्याने तेच प्रधान शुद्धकर्म अमोलिक, अलौकिक सुखाला कारणीभूत ठरते. असा संदेश निरूपणातून दिला. तसेच आख्यानातून श्रीरामवरदायिनी तुळजाचरित्र रंगवून सांगितले. बुवांचा परिचय माधवराव सरपटवार यांनी करून दिला. तर उपस्थितांचे आभार सागर मुने यांनी मानले. वरील कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.