ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे भक्ती – ह.भ.प. वर्षा मुलमुले
सुरेंद्र इखारे वणी :- ” कर्म, ज्ञान, योग इत्यादी विविध मार्गाने परमात्म्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे. विविध महापुरुषांनी त्या दृष्टीने प्रयत्न करून यश देखील प्राप्त केले आहे. मात्र सर्वसामान्य माणसासाठी हे सर्व मार्ग अत्यंत खडतर असून त्याच्यासाठी साधा सोपा भक्तीचा नामस्मरणाचा मार्ग हेच ईश्वरी प्राप्तीचे सगळ्यात सोपे साधन आहे.” असे विचार नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सौ वर्षा मुलमुले यांनी व्यक्त केले.
वणी येथील जैताई देवस्थानच्या चैत्र नवरात्रात स्वर्गीय शांताराम जी कवडे स्मृत्यर्थ आयोजित कीर्तनसेवेच्या निमित्ताने जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या, “जाणे भक्तीचा जिव्हाळा ! तोचि दैवाचा पुतळा !!” या अभंगावर त्या निरूपण करीत होत्या.
प्रास्ताविकामध्ये मंदिराचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी मंदिराच्या उपक्रमांची माहिती देऊन कीर्तनकारांचा परिचय करून दिला.
भगवंताने दिलेला हा अलौकिक मानवी देह त्याच्या सेवेसाठीच उपयोगात आणायला हवा हे सांगत कीर्तनकारांनी अंतकरण शुद्धीसाठी नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायी डॉ. सौ. सुलभा अनिल मुंजे यांनी कीर्तनकारांचा सत्कार केला. मध्यंतरामध्ये अरुण दिवे यांनी अमोलिक रत्ने जोडीली रे तुज ! हा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अभंग सादर केला.
उत्तर रंगात वर्षा मुलमुले यांनी भगवान श्री रामचंद्र आणि केवट यांची कथा सादर केली.
कीर्तन सेवेस संवादिनीवर अरुण दिवे यांनी तर तबल्यावर अभिलाष राजूरकर यांनी साथ संगत केली.