*राष्ट्रभक्ती, अफाट शक्ती आणि लोकोद्धाराचा आदर्श म्हणजे अहिल्यादेवी- ह.भ.प. नूपुर देशपांडे*
श्री जैताई चैत्र नवरात्रौत्सवात रंगले बहारदार कीर्तनसुरेंद्र इखारे वणी: – अहिल्यादेवी होळकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एका श्लोकाप्रमाणे जगल्यात. त्यांचं चरित्र अगदी स्वच्छ म्हणून महाश्वेता ही उपाधी दुर्गादेवी भागवतांनी त्यांना बहाल केली. जगातला सर्वोच्च बहुमान म्हणजे पुण्यश्लोक देवी अहिल्या माता. अहिल्यादेवी म्हणजे अद्भूत दातृत्व आणि कर्तृत्वं. अहिल्यादेवी म्हणजे आदर्श पितृत्वाचा. अहिल्यादेवी म्हणजे आदर्श न्यायदेवतेचा. अहिल्यादेवी म्हणजे आदर्श धर्मशक्तीचा. अहिल्यादेवी म्हणजे राष्ट्रभक्ती, अफाट शक्ती आणि लोकोद्धाराचा आदर्श आहेत. असे प्रतिपादन नागपूर येथील कीर्तनकार ह.भ.प. नूपुर देशपांडे यांनी केलं. श्री जैताई चैत्र नवरात्रौत्सवात त्यांचं सुश्राव्य कीर्तन झालं. त्यात त्यांनी यावर भाष्य केलं.
पूर्वरंगपदासाठी ह.भ.प. नूपुर देशपांडे यांनी ‘स्वर्गींचे अमर इच्छिताती देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ।।’ हे पद घेतले होते. या भूमीत अनेक महामानव होऊन गेलेत. त्यामुळेच देवांनाही इथे जन्म घेण्याची इच्छा होते. या देशात साडेतीन शक्तीपीठे आहेत. तशाच इथे रणझुंजार आणि निपुण राजकारणी स्त्रियादेखील झाल्यात. त्यातील एक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
अहमदनगर जिल्ह्यात चौंडी नावाचा एक छोटाशा गावात सुशीलाबाई शिंदे आणि माणकोजी शिंदे यांच्या पोटी जन्म झाला.अतिशय सुसंस्कृत असं हे कुटुंब होतं. त्यामुळे शस्त्र व शास्त्राचे धडे अहिल्यादेवींना लहानपणीच मिळालेत. पुढे मल्हारराव होळकरांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पती गेल्यानंतर घरात पंधरा मरण बघणारी अहिल्यादेवी एकमेव. अहिल्याबाई होळकर अत्यंत दूरदर्शी होत्या. त्यांनी मोठमोठाले रस्ते आणि घाट बांधलेत. पर्यावरणावरही त्यांनी बरंच काम केलं. त्यांनी आपलं राजकीय कौशल्य आणि औदार्य लोकोद्धारासाठीच वापरलं. देशपांडे यांनी यांसह अहिल्यादेवींच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर प्रकाश टाकला. कीर्तनात संवादिनीची साथ अरुण दिवे यांनी तर तबल्याची साथ अभिलाष राजूरकर यांनी केली. संचालन माधव सरपटवार यांनी केले. आभार सुनील इंदुवामन ठाकरे यांनी मानलेत. हे पुष्प प्रतिभाताई कवडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले होते.