तिसऱ्या पिढीत कोणतेही घराण्याचे कार्य लोप पावते मात्र आमटे घराणे अपवादात्मक आहे – देवेंद्र गावंडे
आमटे दाम्पत्य शिक्षणव्रती पुरस्काराने गौरवान्वित
सुरेंद्र इखारे वणी :- येथील जैताई देवस्थानच्या चैत्र नवरात्र उत्सवात आचार्य मामा क्षीरसागर स्मृती दिनाच्या निमित्ताने प्राचार्य राम शेवाळकर स्मृती शिक्षणव्रती पुरस्काराने विश्वविख्यात आमटे परिवाराची तिसरी पिढी असणाऱ्या श्री अनिकेत तथा सौ.समीक्षा आमटे यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणीचे भूतपूर्व आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्यासह व्यासपीठावर लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे ,विद्यमान आमदार संजय देरकर, प्रसिद्ध उद्योगपती आशुतोष शेवाळकर, वणी येथील दानदाते विजय चोरडिया, वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशीष खुळसंगे तथा देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अमृता आणि ऐश्वर्या अलोणे यांनी सादर केलेल्या शृंखला पायी असू दे ! या बाबा आमटेंच्या गीताने कार्यक्रमाचा आरंभ झाला.
अपर्णा देशपांडे ,अरुणा उत्तरवार, अर्चना उपाध्ये आणि सारिका इंगोले यांनी कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात हे गीत सादर केले.
प्रास्ताविकामध्ये माधव सरपटवार यांनी मंदिराच्या विविध सामाजिक उपक्रमांचा परिचय करून दिला.
देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ मानचिन्ह आणि अकरा हजार रुपये रोख अशा स्वरूपातील पुरस्कार प्रदान केल्यानंतर अन्नछत्र समितीच्या द्वारे देखील आमटे दांपत्याचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संजीव रेड्डी बोदकुरवार, संजय देरकर, आशीष खुळसंगे, विजय चोरडिया आणि डॉ .विकास हेडाऊ यांनी हेमलकशाच्या उपक्रमाला भरघोस देणगी प्रदान केली हे विशेष उल्लेखनीय.
सामान्यतः तिसऱ्या पिढीत कोणतेही घराण्याचे कार्य लोप पावते मात्र हे अपवादात्मक घराणे आहे. या घराण्याच्या प्रयत्नाने हेमलकसा हे सेवा तीर्थ झालेले आहे. आजूबाजूच्या भयानक हिंसेच्या प्रवाहाला अलगद टाळत आदिवासींच्या जीवनात शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून वास्तव विकास साधणारे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे विचार देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले.
बाबांच्या कार्यापासून प्रेरणा घेत या जोडीकडे पाहून आपल्यालाही अशी प्रेरणा लाभावी असे विचार आमदार संजय देरकर यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी शिक्षणाच्या क्षेत्रातील वणीच्या इतिहासाचा आढावा घेत तेथे प्राप्त होणाऱ्या शिक्षणाव्रती पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित केले.
अनिकेत आमटे यांनी आपल्या मनोगतांमध्ये नेलगुंडा येथील शाळेची स्थापना, तेथील समस्या, त्यावर प्रयत्नपूर्वक केलेले उपाय, समाजाची याकडे पाहण्याची आवश्यक दृष्टी, विद्यार्थ्यांच्या यशातून मिळणारे समाधान अशा अनेक पैलूंना स्पष्ट केले. तर समीक्षा आमटे यांनी या सर्व प्रयत्नात मी स्वतःच अधिक शिकले असे म्हणत त्या प्रांतात सुरू असणाऱ्या विकासाला सुयोग्य दिशा असायला हवी यावर भर दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी अपर्णा देशपांडे आणि अरूणा उत्तरवार यांनी दिव्यत्वाची जेथे प्रचिती हे गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन स्वानंद पुंड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर मुने, जयंत लिडबिडे, नामदेव पारखी यांनी विशेष परिश्रम घेतले.