वणी मध्ये शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न.
सुरेंद्र इखारे वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील वणी बहुगुणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वणी शहरांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या यजमानत्वात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आंतर महाविद्यालयीन स्तरावरील मुलांची शरीर सौष्ठव स्पर्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रीतीने संपन्न झाली.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या अध्यक्षतेखाली, विदर्भ बॉडी बिल्डिंग फिटनेस असोसिएशनचे उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभात डॉ.प्रशांत विघे, डॉ.विलास ठाकरे, डॉ. कल्याण मालधुरे, डॉ. उमेश राठी, डॉ. नितीन देऊळकर, प्रा. विराट घुडे, डॉ.अनुज केला, ॲड. धनंजय लोखंडे, अशोक सोनटक्के,नरेंद्र ठाकरे, अनिल जयस्वाल, ओमप्रकाश चचडा, प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे, औषधी निर्माण शास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ सुधाकर रेड्डी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी स्वतःच्या आरोग्य संपन्नतेतून इतरांना सेवा प्रदान करण्याची प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आणि सुयोग्य कार्यासाठी आपले शरीर हेच महत्त्वपूर्ण साधन आहे ही भूमिका मनी ठसावी यासाठी हे आयोजन असल्याचे स्पष्ट केले.
स्पर्धेचे परीक्षक विलास ठाकरे यांनी आजपर्यंत असे भव्य आयोजन पाहिले नाही याबद्दल समाधान व्यक्त करीत परीक्षणात निष्पक्षता ठेवण्याचे अभिवचन दिले.
अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रशांत विघे यांनी जिद्द चिकाटी आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले.
उद्घाटक अविनाश लोखंडे यांनी वणी नगरातील शरीर सौष्ठव स्पर्धेच्या इतिहासावर विस्तृत प्रकाश टाकत, सुदृढ शरीरात सुदृढ मन निवास करते या सिद्धांतानुसार आरोग्य हाच सर्वश्रेष्ठतेचा आधार आहे हे स्पष्ट केले. केवळ क्रिकेटचा नाद सोडून या अस्सल भारतीय क्रीडा प्रकारांचा विद्यार्थ्यांनी अवलंब करावा आणि त्यासाठी असे उत्सवासारखे वाटणारे आयोजन असावे अशी आशा व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी विदर्भाचे पुणे असणाऱ्या वणीच्या विविध विषयातील योगदानाचे वर्णन करीत, वणी नगरामध्ये अशा स्वरूपात प्रथमच होत असलेल्या विद्यापीठीय स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.
अमरावती विद्यापीठाच्या ५ ही जिल्ह्यांमधून विविध ६ गटांमध्ये एकूण २२ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले. प्रा. विराट घुडे, डॉ.अनुज केला, अविनाश लोखंडे या मान्यवरांनी परीक्षणाचे कार्य केले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक गटातील प्रथम तीन स्पर्धकांना पदकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेतून विद्यापीठाद्वारे निवड झालेले स्पर्धक पुढे अखिल भारतीय स्तरावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग संचालक प्रा. उमेश व्यास यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी केले. स्पर्धेच्या सादरीकरणाचे सूत्रसंचालन अविनाश लोखंडे यांनी केले.
वणीकर जनतेचा आणि प्राधान्याने तरुणाईचा मिळालेला प्रतिसाद आयोजनाचे वैशिष्ट्य होय.






