Tuesday, January 13, 2026
Google search engine

संविधान जनजागृती अभियाननिमित्त मारेगाव येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

संविधान जनजागृती अभियाननिमित्त मारेगाव येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

सुरेंद्र इखारे वणी – : भारतीय संविधानाच्या मूल्यांची जनजागृती व्हावी, लोकशाहीविषयक जाण वाढावी तसेच विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व व विचारमंथन कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथे संविधान जनजागृती अभियाननिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मारेगाव तालुक्यातील विविध महाविद्यालये तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संविधान आणि तरुणांची जबाबदारी, भारतीय संविधान : लोकशाहीचे रक्षणकर्ता, लोकशाही मूल्ये, मूलभूत हक्क व कर्तव्ये, सामाजिक न्याय आणि संविधानाचे वर्तमानातील महत्त्व या विषयांवर अभ्यासपूर्ण व प्रभावी मांडणी केली. उपस्थित प्रेक्षक, प्राध्यापक व परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचे विशेष कौतुक केले.
वरिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील वेदांत सिडाना (B.Sc. – III) यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणामुळे प्रथम क्रमांक पटकावला. त्याच महाविद्यालयातील कुणाल ढोके (B.Sc. – I) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर ITI कॉलेज, मारेगाव येथील अभिजित नगराळे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कनिष्ठ गटामध्ये विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, मारेगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. मोहित गोडे यांनी प्रथम, चेतन बोंडे यांनी द्वितीय, तर सानिका वैद्य यांनी तृतीय क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला.
या स्पर्धेचे आयोजन इतिहास, राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
स्पर्धेचे परीक्षण वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. प्रदीप माकडे व गणित विभाग प्रमुख प्रा. अक्षय जेणेकर यांनी निष्पक्ष व अभ्यासपूर्ण पद्धतीने केले. स्पर्धेदरम्यान वेळेचे काटेकोर नियोजन राखण्याची जबाबदारी प्रा. माधुरी शेंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी केले. कार्यक्रमास प्रा. डॉ. मोहनीश बोखड विदर्भ ज्ञान विज्ञान ज्ञान विज्ञान संस्था अमरावती यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर अध्यक्षस्थान इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रा. गजानन सोडणर यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अस्मिता ढवस यांनी केले, तर समारोपप्रसंगी राज्यशास्त्र विभागाचे प्रा. प्रविण पोटे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास तालुक्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. समारोपप्रसंगी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच भविष्यातही संविधानिक मूल्यांची जनजागृती करणारे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular