वणी येथील साप्ताहिक मुक्त ललकारचे संपादक प्रवीण शर्मा यांचे निधन
सुरेंद्र इखारे वणी :- येथील साप्ताहिक मुक्त ललकारचे संपादक प्रविण दिवानचंद शर्मा (वय ४८) यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पत्रकारिता क्षेत्रासह मित्रपरिवार, नातेवाईक आणि विविध सामाजिक स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, १३ जून रोजी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातामुळे मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्या असून त्यांना लकव्याचाही झटका आला होता. त्यानंतर त्यांना वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रविण शर्मा यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आधारवड हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पार्थिवावर शनिवार रोजी वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




