विठ्ठलवाडी येथे भव्य एकल भजन स्पर्धा -भक्तिरसात न्हाली विठ्ठलवाडी .
सुरेंद्र इखारे वणी :- गुरुदेव सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून भव्य एकल भजन स्पर्धेचा उद्घाटन आणि बक्षीस वितरण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला . या स्पर्धेत परिसरातील 48 नामवंत भजनी कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संकल्पगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली . पारंपारिक भजनी कलेंचे महत्त्व अधोरेखित करून आजच्या तरुण पिढींनी हा सांस्कृतिक वारसा पुढे चालवावा असे मत ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी व्यक्त केले . उद्घाटनीय भाषणातून ते,भजनी कलाकारांना प्रेरित करीत होते. स्पर्धकाने राष्ट्रसंताची भजने सादर करून संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन काढले. पुरुष गटातून हरिभाऊ भट, पवन खिरटकर व धुळे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला तर महिला गटातून माया रासेकर , रजनी मांडवकर व सावेताई यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांचा शाल श्रीफळ व ग्रामगीता देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. परीक्षक म्हणून राजेंद्र कोरडे, विजया दहेकर व नंदगिरवार दादा उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गुणवंत पचारे , उद्घाटक म्हणून ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे उपस्थित होते. राष्ट्रवंदनेनी या सोहळ्याची सांगता झाली. संचालन प्रमोद राजुरकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा प्रचार प्रमुख मारोती ठेंगणे तर आभार शारदा बलकी यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील भजनी कलावंत, रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी देविदास शेटे, पुंडलिक धोबे , संजय खाडे, लक्ष्मण जुमनाके, ज्ञानेश्वर कडुकर ,शंकर किनाके , नाना बदखल , मनोहर झाडे, बाबाराव कुडमेथे , भय्याजी तेजे, प्रभा आसेकर , संगीता पेंदोर , सिंधू गिरडकर, बेबी दानव, रुंदा पाटेकर व गुरुदेव उपासकांनी सहकार्य केले.




