नगर वाचनालयात साने गुरुजींची ७६ वी पुण्यतिथी साजरी
सुरेंद्र इखारे वणी :
ज्येष्ठ साहित्यिक, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांची ७६ वी पुण्यतिथी गुरुवारी (११ जून) येथील नगर वाचनालयात भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. नगर वाचनालयात लावण्यात आलेल्या साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ तसेच साने गुरुजींच्या विचारांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ममता, करुणा आणि देशभक्तीची मूर्ती असलेल्या साने गुरुजींनी समाजाला दिलेल्या शिकवणीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. साने गुरुजी हे ‘श्यामची आई’ या अजरामर साहित्यकृतीमुळे विशेष प्रसिद्ध असून, हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अमूल्य ठेवा मानले जाते. त्यांच्या साहित्याने आणि विचारांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचेही यावेळी वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सचिव प्रा. अभिजित अणे यांनी केले. याप्रसंगी प्रा. स्वानंद पुंड, हरिहर भागवत, अशोक सोनटक्के, राजेश महाकुलकर, स्नेहलता चुंबळे, अरुण कावडकर, गजानन भगत, राजू धावंजेवार, लता पांडे, सुनील इंदुवामन ठाकरे, जयंत लिडबिडे, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार आणि कल्पना राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




