लोकनायक बापूजी अणे यांचे जीवन म्हणजे जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा यज्ञकुंड
देवेंद्र प्रभुणे यांनी ‘लोकनायक बापूजी अणे यांच्या राष्ट्रकार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला.सुरेंद्र इखारे वणी :
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी व नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने तिथीनुसार लोकनायक बापूजी अणे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी नगर वाचनालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.यवतमाळ येथील प्रसिद्ध वक्ते देवेंद्र प्रभुणे यांनी ‘लोकनायक बापूजी आणि एक जाज्वल्य यज्ञकुंड’ या विषयावर प्रभावी व्याख्यानातून बापूजी अणे यांच्या राष्ट्रकार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ. अभिजीत अणे होते. व्यासपीठावर नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार व डॉ. दिलीप अलोणे उपस्थित होते.
प्रभुणे यांनी सांगितले की, लोकनायक बापूजी अणे यांचा जन्म वैदिक संस्कारांनी संपन्न अशा कुटुंबात झाला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत भाषेचे अध्ययन त्यांना घरातील संस्कारांतूनच मिळाले. समिधा स्वतः जळून इतरांना प्रकाश देते आणि परिसर शुद्ध करते, त्याप्रमाणे बापूजी अणे यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाची समिधा अर्पण केली.
यवतमाळमध्ये त्यांनी युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आणि तरुण पिढीला राष्ट्रकार्याची दिशा दिली. वकिली व्यवसायातून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करताना त्यांनी राष्ट्रसेवेलाच आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय मानले. लोकमान्य टिळकांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यामुळेच ते विदर्भाचे ‘लोकमान्य’ म्हणून जनमानसात लोकप्रिय झाले.
बापूजी अणे यांच्याकडे भविष्याचा वेध घेण्याची विलक्षण क्षमता होती. भारतातील ग्रामीण जीवनशैलीचे त्यांना सखोल आकलन होते. प्रत्येक गावात ग्रामपंचायती असाव्यात, असा त्यांचा आग्रह होता. राष्ट्रहिताला त्यांनी व्यक्तीपेक्षा सर्वोच्च स्थान दिले. त्यामुळेच महात्मा गांधींचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. वैदिक संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती असून तिचे महत्त्व जपले पाहिजे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. मात्र, भारतातील खिलाफत चळवळीला त्यांनी स्पष्ट विरोध केला होता.
ग्रामीण जनतेवर अन्याय करणाऱ्या इंडियन फॉरेस्ट अॅक्टविरोधात त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातून जंगल सत्याग्रहाला सुरुवात केली. या आंदोलनामुळे बापूजी अणे लोकनायक झाले. विदर्भाच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी त्यांनी प्रारंभीपासूनच संघर्ष केला. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी दोन वेळा खासदारकीची निवडणूकही जिंकली. विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेसाठीही त्यांनी पुढाकार घेतला.
विशेष म्हणजे पद्मविभूषण हा सन्मान जाहीर झाला, त्याच दिवशी बापूजी अणे यांची प्राणज्योत मालवली, हा त्यांच्या जीवनप्रवासातील अत्यंत भावस्पर्शी योगायोग असल्याचे प्रभुणे यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अभिजीत अणे यांनी नागपूर करारानुसार विदर्भातील युवकांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये २२ टक्के प्रतिनिधित्वाची तरतूद करण्यात आली होती; मात्र तिची पूर्ण अंमलबजावणी झाली नाही, असे सांगितले. स्वतंत्र विदर्भासाठी बापूजी अणे यांनी त्या काळापासूनच संघर्ष सुरू केला होता. मात्र, दुर्दैवाने आजही स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न प्रलंबित आहे. बापूजी अणे यांचे संपूर्ण जीवन देशभक्तीने भारलेले होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विजय गंधेवार यांनी लोकनायक बापूजी अणे यांच्या जीवनावर स्वरचित गीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय अरुण कावडकर यांनी करून दिला. प्रास्ताविक गजानन कासावार यांनी केले. ‘मस्त कलंदर’ या गौरवग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त डॉ. दिलीप अलोणे यांचा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या जयंतीनिमित्त सकाळी त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे उपाध्यक्ष अशोक सोनटक्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव राजेश महाकुलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.


यवतमाळ येथील प्रसिद्ध वक्ते देवेंद्र प्रभुणे यांनी ‘लोकनायक बापूजी आणि एक जाज्वल्य यज्ञकुंड’ या विषयावर प्रभावी व्याख्यानातून बापूजी अणे यांच्या राष्ट्रकार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला.

