Monday, September 28, 2026
Google search engine

लालपुलिया परिसरातील कोळसा डेपो हटविण्याबाबतचे निवेदन स्माईल फाउंडेशनने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना

लालपुलिया कोळसा डेपो हटविण्याबाबतचे निवेदन स्माईल फाउंडेशनने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना 

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; वाढते प्रदूषण, गंभीर आजार आणि अपघातांमुळे नागरिक त्रस्त;

सुरेंद्र इखारे वणी : शहरातील लालपुलिया परिसरातील कोळसा डेपो कायमस्वरूपी हटविण्या बाबतचे स्माईल फाउंडेशन ने  दिले उपविभागीय  अधिकाऱ्यांना निवेदन.

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिक कोळशाची धूळ, जड वाहनांचा धूर आणि सततच्या वाहतुकीमुळे त्रस्त आहेत. कोळशाच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरात खोकला, दमा, श्वसनाचे विकार तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. वारंवार होणाऱ्या आजारांमुळे सर्वसामान्य कुटुंबांना उपचारासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा हा कोळसा डेपो तातडीने हटविण्यात यावा, अशी मागणी स्माईल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

कोळशाची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे लालपुलिया परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे . त्यामुळे परिसरातील नागरिकांसह वणी शहर व आजूबाजूच्या गावांतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कोळसा डेपोमुळे काही व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला असेल; मात्र वणी शहरातील सर्वसामान्य जनतेला यातून नेमका काय फायदा झाला, असा सवाल स्माईल फाउंडेशनने उपस्थित केला आहे. आर्थिक लाभ काही मोजक्या लोकांचा आणि प्रदूषण, आजारपण व अपघातांचा त्रास मात्र संपूर्ण परिसरातील जनतेला, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. कोळसा डेपोच्या माध्यमातून नफा कमावणाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारीही लक्षात घ्यावी. विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी तडजोड होऊ नये, अशी भूमिका स्माईल फाउंडेशनने    मांडली  आहे.
केवळ पाण्याची फवारणी, रस्त्यांची साफसफाई किंवा वाहतुकीचे नियमन करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही. नागरिकांच्या आरोग्याचे व जीविताचे रक्षण करण्यासाठी लालपुलिया येथील कोळसा डेपो लोकवस्तीपासून दूर असलेल्या योग्य ठिकाणी कायमस्वरूपी स्थलांतरित करावी. यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच स्थलांतरासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त रमेश बोबडे , डॉ. विश्वास सुंदरानी , स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव व सचिव आदर्श दाढे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular