वणीकरांनी लुटला नात्यातील गाण्यांचा आस्वाद.
वणीत प्रथमच अभिवाचनाचा कार्यक्रम
सुरेंद्र इखारे वणी :- येथील जैताई देवस्थानच्या वासंतिक नवरात्र उत्सवामध्ये नागपूर येथील चिटणवीस सेंटरच्या द्वारे सादर नात्यातील गाणी या कथा अभिवाचनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने वणीकर रसिकांची मने जिंकून घेतली.
नागपूर येथील सुप्रसिद्ध लेखक तथा नाटककार उदयन ब्रह्म यांनी लिहिलेल्या विविध कथांचे शुभदा फडणवीस आणि रवींद्र दुरतकर यांनी केलेले सादरीकरण हा खरोखरच एक मनोज्ञ असा अनुभव होता.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मंदिराचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी वणी नगरी प्रथमच अशा पद्धतीचा अभिवाचनाचा कार्यक्रम होत असल्याचा आनंद व्यक्त करीत उदयन ब्रह्म यांच्या लेखन कर्तृत्वाचा आढावा घेतला.
शुभदा फडणवीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना उदयन ब्रह्म यांच्या लेखनाची विविध वैशिष्ट्ये उघडून दाखवीत कथांची पार्श्वभूमी तयार केली.
पुढच्या जन्माची आई या रवींद्र दुरतकर यांनी सादर केलेल्या कथेत रेल्वेच्या प्रवासात भेटलेल्या अनाथ मुलावर एका मातेच्या प्रेमाच्या वर्षावाचा रसिकांना वात्सल्यपूर्ण परिचय घडवून दिला.
त्यानंतर शुभदा फडणवीस यांनी अचानक गमावलेल्या प्रेयसीच्या विरहात झुरणाऱ्या आणि तरी गाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची हृदय रिकामे घेऊन फिरतो ही कथा सादर केली.
घरच्यांनी आणि आजूबाजूच्यांनीही दगड संबोधिलेल्या कथानायकाला त्या दगडातूनच मूर्ती घडवण्याचे अलौकिक कौशल्य कसे प्राप्त झाले? हे सांगणारे मूर्तिकार या कथेने श्रोत्यांची मने जिंकली.
पतीच्या निधनानंतर मुलीच्या घरी राहावे लागल्याने तेथील शांततेला तडा जाऊ नये म्हणून अत्यंत कठीण असे मौनव्रत धारण करणाऱ्या कथा नायिकेची पण बोलणार नाही ही कथा श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी तराळणारी ठरली.
आपल्याच लेखनातील पात्रांच्या जगामध्ये हरवलेला आणि त्यांना वास्तव समजणारा लेखक प्रारब्ध या कथेमध्ये सुन्न करणारा अनुभव प्रदान करून गेला. सृजनशील तिच्या मागे असणाऱ्या एका वेगळ्याच वास्तवाला या कथेने अधोरेखित केले.
शेवटच्या चंदन या रवींद्र दुरुतकर आणि शुभदा फडणवीस यांनी मिळून सादर केलेल्या कथेत आईच्या आणि मुलाच्या नात्यातील एक वेगळाच पदर श्रोत्यांच्या समोर प्रस्तुत करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उदयन ब्रह्म यांनी नात्यांना जात असलेल्या तड्यांची खंत व्यक्त करून नात्यांमधील भरजरीपण जपायला हवे असे आवाहन करीत फुटाणेवाली ही कविता सादर केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विदर्भ साहित्य संघाचे वणी शाखेचे अध्यक्ष डॉ दिलीप अलोणे यांनी केले.