डॉ. स्वानंद पुंड यांच्याद्वारे गणेश भक्तीचा वैश्विक प्रचार घडावा – पू. शंकराचार्य
सुरेंद्र इखारे वणी :- ” भगवान गणेशांच्या वैभवाला ग्रंथ निर्मिती, व्याख्यान- प्रवचन सेवा तथा अत्याधुनिक माध्यमे इ. विविध अंगांनी निरूपित करणारे विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांचे अविरत प्रयास हे खरोखरच अलौकिक असून, योगींद्र मठपरंपरेच्या प्रचार आणि प्रसाराच्या त्यांच्याद्वारे घडत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि ईश्वरी कार्याच्या माध्यमातून गणेश भक्तीच्या प्रचार आणि प्रसाराची ध्वजा सर्व विश्वात सदैव फडकत राहो.” असा आशीर्वाद संकेश्वर-करवीर पीठाधीश्वर शंकराचार्य परमपूज्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती स्वामी महाराजांनी प्रदान केला. श्रीक्षेत्र रांजणगाव येथे महागणपतीच्या चरणी जेष्ठ शुद्ध चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर श्री संकेश्वर करवीर शंकराचार्य मठाद्वारे डॉ. स्वानंद पुंड यांना गाणेश ज्ञान प्रबोधक अशी वैभवशाली उपाधी प्रदान करताना आचार्यश्री आशीर्वचन देत होते.
कार्यक्रमाच्या आरंभी श्री रांजणगाव देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्री ओंकार तथा सौ. रूपाली देव यांनी श्री शंकराचार्याची पादुकापूजा संपन्न करून देवस्थानाद्वारे आचार्यश्रींना श्री महागणपतीचा प्रसाद प्रदान केला.
देवस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा सौ.स्वातीताई पाचुंदकर यांनी मंडळाच्या द्वारे प्रचलित विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यांचा परिचय करून देत अशा प्रकारचा हा सन्मान श्री रांजणगाव क्षेत्रावर होत असल्याचा संस्थानला आणि समस्त ग्रामवासियांना वाटत असलेला अभिमान व्यक्त करून श्री मठाद्वारे प्रदान होणाऱ्या, डॉ .पुंड यांच्या श्रीगणेश विषयक विविध कार्यांचे गुण गौरव करणाऱ्या सन्मानपत्राचे वाचन केले.
आचार्य श्रींच्याद्वारे डॉ. स्वानंद पुंड, सौ. प्रणिता पुंड तथा चि. कैवल्य पुंड यांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना उपाधीपत्र प्रदान करण्यात आले.
आपल्या आशीर्वचनामध्ये पू. शंकराचार्यांनी त्यांचे परमगुरु आणि श्री गजानन महाराज पुंड शास्त्री यांच्या गुरुबंधूत्वाचा उल्लेख करीत स्वानंद पुंड यांच्या सातत्यपूर्ण प्रचार कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
श्री स्वानंदेश स्तोत्र या विषयावर सुरू असलेल्या निरूपण मालिकेत या अपूर्व सन्मानाविषयी डॉ. स्वानंद पुंड यांनी, हे अनेक जन्माच्या पुण्याचे फळ असून, गेल्या सात पिढ्यांपासून घराण्यात प्रचलित असणाऱ्या गणेश भक्तीला प्राप्त झालेला महान गौरव असल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व विश्वस्त तथा व्यवस्थापक बाळासाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनात सर्व कर्मचारी वर्गांनी विशेष परिश्रम घेतले.





