*सेवानिवृत्त शिक्षक श्री दिवाकर मारोती नरुले यांचा हृद्य सत्कार सोहळा संपन्न*
सुरेंद्र इखारे वणी: – ग्रामीण विद्यालय परमडोह येथून २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले शिक्षक श्री दिवाकर मारोती नरुले यांचा 01जुलै २०२५ रोजी एक हृद्य सत्कार सोहळा त्यांच्या पुतण्यांच्या, भाचीच्या व कुटुंबीय- आप्तस्वाकीयांच्या पुढाकाराने जैन लेआऊट मधील अन्नपूर्णा हॉल मध्ये आयोजित करण्यात आला.कौटुंबिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात मान्यवर आणि आप्तेष्टांनी नरुले सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. भाऊराव कावडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार श्री रामगुंडे साहेब आणि विमाशीचे जिल्हा कार्यवाहक श्री रामकृष्ण जिवतोडे सर यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. कावडे साहेबांनी आपल्या भाषणात श्री नरुले सरांनी संस्थेची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी यापुढेही नरुले सरांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये आपले भरीव योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी मा.श्री रामगुंडे साहेब, श्री जिवतोडे सर,लाखाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय झाडगाव चे माजी प्राचार्य /मुख्याध्यापक श्री. सुभाष ताजने सर, आदर्श माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय मार्डी चे माजी /प्राचार्य /मुख्याध्यापक श्री विलास ताजने सर, गुरुदेव विद्यालय व उच्च माध्य. विद्यालय शिरपूर चे प्राचार्य सुधीर वटे, आणि विमाशी वणी तालुका अध्यक्ष श्री. किशोर बोढे सर यांनीही मनोगत व्यक्त केले. नरुले सरांनी आपल्या मनोगनात कौटुंबिक व शैक्षणिक क्षेत्रात आलेल्या अडचणीवर मात करुन कसे यशस्वी होता येऊ शकते हे उपस्थितांना विविध अनुभव कथन करुन पटवून दिले.सर्वांनी नरुले सरांना पुढील आरोग्यमय आणि सुखमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या सत्कार सोहळ्यात विदर्भ माध्यमिक संघ यवतमाळ जिल्हा पदाधिकारी, खैरे कुणबी समाज संघटना वणी, विमाशी वणी तालुका आणि अनेक आप्त-स्वकीयांनी श्री नरुले सरांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वणी प्रक्षेत्र खाजगी शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री भूपेंद्र देरकर, अन्य संचालक, मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे, मुख्याध्यापक मनोज वरारकर तसेच अनेक शिक्षक-शिक्षकेतर सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री दत्तू महाकुलकर सरांनी केले.उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारे नितांत सुंदर प्रास्ताविक मंजुषा डंभारे यांनी केले, तर श्री.संकेत नरुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.




