डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या संकल्पनेवर दोन दिवसीय व्याख्यान
विद्यार्थ्यांना सामाजिक विज्ञानाच्या संशोधनात शास्त्रशुद्ध दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन
नागपूर ( जयंत साठे ) – डॉ. आंबेडकर अभ्यासन व विचारधारा विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समतेविषयीची संकल्पना आणि सामाजिक विज्ञानाची संशोधन पद्धती या विषयांवर 9 व 10 जुलै 2025 रोजी दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेत डॉ. अजय चौधरी, प्राध्यापक, डॉ. आंबेडकर चेअर, सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर चेअर व विचारधारा विभागप्रमुख डॉ. अविनाश फुलझेले होते.
पहिल्या सत्रात (9 जुलै) डॉ. अजय चौधरी यांनी डॉ. आंबेडकरांनी मांडलेली सामाजिक समतेची संकल्पना विशद केली. त्यांनी सांगितले की, “डॉ. आंबेडकरांनी असमान प्रतिकूल परिस्थितीतून समतेचा मार्ग दाखवत तळागाळातील लोकांपर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी संघर्ष केला. विविधतेत एकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या विचारांची आजच्या काळात अधिक गरज आहे.”
दुसऱ्या सत्रात (10 जुलै) डॉ. चौधरी यांनी फ्रेंच समाजशास्त्रज्ञ एमिल दुर्खाईन यांच्या पवित्रता व अपवित्रतेच्या संकल्पना मांडत त्या डॉ. आंबेडकरांच्या अस्पृश्यतेवरील चिंतनाशी कशा जोडल्या जाऊ शकतात याचे विवेचन केले. त्यांनी स्वकथन या संकल्पनेचाही संदर्भ देत सांगितले की, संशोधकाने आपला दृष्टिकोन तटस्थ ठेवून वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अविनाश फुलझेले यांनी भारतीय समाजजीवनाच्या संदर्भात डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक विज्ञानाच्या संशोधनामध्ये शिस्तबद्ध व शास्त्रशुद्ध दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम.ए. (सेमेस्टर ३) चे विद्यार्थी अल्का जरोंडे आणि अरविंद टेंभुर्णे यांनी केले. आभारप्रदर्शन वसंत खिरळे आणि राजेंद्र कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ. गौतम कांबळे, डॉ. रमेश शंभरकर, डॉ. सरोज डांगे, डॉ. मोहन वानखडे, मंगेश जुनघरे, प्रीती वानखेडे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.




