वणीच्या आदर्श हायस्कूल मध्ये शिक्षकांना मिळाले नैतिक मूल्यांचे प्रशिक्षण.
सुरेंद्र इखारे वणी :- इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी अनुदानीत, व आश्रम शाळेतील शिक्षकांसाठी,तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण टप्पा दोन चे आयोजन गटसाधन केंद्र पंचायत समिती वणीच्या वतीने आदर्श हायस्कूल येथे करण्यात आले.या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशीच्या प्रशिक्षणात १३८शिक्षक सहभागी झाले होते.हे प्रशिक्षण आठ ते दहा डिसेंबरपर्यंत देण्यात येत आहे.आदर्श हायस्कूल येथे आयोजित तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन प्रसंगी आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक रघुनाथ मोहिते म्हणाले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सचोटी, जबाबदारी आणि इतरांबद्दल आदर यांसारखे चांगले नैतिक मूल्ये रुजविणे ही काळाची गरज असून त्यांना चांगला मार्ग दाखवून विद्यार्थ्यांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनविणे हे शिक्षकाचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले.
तसेच समन्वयक विनोद नासरे विचार व्यक्त करताना म्हणाले विद्यार्थ्यांना केवळ चांगले शिक्षणच मिळावे एवढाच उद्देश न ठेवता त्यापुढे जाऊन त्यांना नैतिक आणि सामाजिक मूल्यांचे प्रशिक्षण मिळावे हा या प्रशिक्षणाचा उद्देश असल्याचे मत व्यक्त केले .
प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य आर एल मोहिते हे होते प्रमुख अतिथी समन्वयक विनोद नासरे, मूल्यवर्धन समन्वयक मस्के सर, सुलभक धनराज गोसावी, प्रविण ढेंगळे, मीनल बेजलवार, माधुरी कावडे, प्रविण गेडाम, प्रकाश तालावार, जयवंत आगलावे, मीना नागभिडकर, रूपाली मोवाडे, आदींची उपस्थिती होती.प्रशिक्षणाचे प्रास्ताविक समन्वयक विनोद नासरे यांनी केले.तर सूत्रसंचालन व आभार वैजनाथ खडसे यांनी मानले . यशस्वितेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.





