Saturday, August 8, 2026
Google search engine

गजानन कासावर हे शिक्षण क्षेत्रातुन निवृत्त झाले परंतु सर्वांच्या हृदयातून नाही  – मा हंसराज अहीर

  • गजानन कासावर हे शिक्षण क्षेत्रातुन निवृत्त झाले परंतु सर्वांच्या हृदयातून नाही  – मा हंसराज अहीर

* अविरत कार्याचा गौरव *

सुरेंद्र इखारे वणी:  –   शिक्षक कसा असावा याचा उत्तम आदर्श म्हणजे गजानन कासावार होत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं कार्य हे अनुकरणीय आहे. ते केवळ पुस्तकी ज्ञान देणारे शिक्षक नाहीत. तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावणारे खरे मार्गदर्शक आहेत. असे गौरवोद्गार माजी केंद्रिय मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर यांनी काढलेत. नगर परिषद शाळा क्रमांक सातचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून गजानन कासावार सेवानिवृत्त झालेत. त्या निमित्त आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात अहीर बोलत होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान आमदार संजय देरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी आमदार वामनराव कासावार, तालुका संघचालक हरिहर भागवत, वणी नगरपालिकेच्या अध्यक्ष विद्या आत्राम, मनसे पक्षनेते राजू उंबरकर, यवतमाळ अर्बन बँकेचे नितीन खर्चे, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्याचे उद्घाटक म्हणून बोलताना हंसराज अहिर यांनी गजानन कासावार यांच्या व्यापक कार्यक्षेत्रावर प्रकाश टाकला. कासावार ह्यांनी आपल्या अध्यापनाला केवळ नोकरी मानले नाही, तर ते एक व्रत म्हणून जगलेत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेमाने जवळ करणे आणि त्याच्यातील कलागुणांना वाव देणे, हा सरांचा सहज स्वभाव आहे. आज ते नोकरीतून निवृत्त होत असले, तरी ते सर्वांच्या हृदयातून कधीच निवृत्त होणार नाहीत. असे गौरवोद्गार अहीर ह्यांनी काढलेत.
आमदार संजय देरकर यांनी कासावार यांच्या अविरत कार्याचा गौरव केला. त्यांचे साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरक असल्याचं ते म्हणालेत. त्यांनी लावलेले ज्ञानाचे रोपटे आता वटवृक्ष झाले असल्याचं ते म्हणालेत.
यवतमाळ अर्बन बँकेचे नितीन खर्चे यांनी कासावर यांचा सिनेट सदस्य म्हणून केलेल्या विशेष कार्याचा आढावा घेतला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष संमेलनांचं आयोजन केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यंत मांडण्यात यांचा मोलाचा वाटा असल्यासही ते म्हणालेत.
विजय चोरडिया यांनी कासावार यांच्या विविध क्षेत्रांतील कार्यांची प्रशंसा केली. आदर्श शिक्षकाचे अनेक सद्गुण कासावर यांच्यात असल्याचं ते म्हणालेत. त्यांनी दिलेली सुसंस्कारांची शिदोरी विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगात येईल असा विश्वास चोरडियांनी व्यक्त केला.
गजानन कासावार हे बहुपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असल्याचं वणी नगरपालिका अध्यक्ष विद्या आश्रम यांनी प्रतिपादन केलं. नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ आदींमध्ये त्यांच्या सक्रिय कार्याची त्यांनी दखल घेतली. विविध क्षेत्रांत कासावार ह्यांनी भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गौरव केला.
मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांनी कासावार यांचे एक प्रयोगशिल शिक्षक म्हणून विशेष कौतुक केले. त्यांचा व्यापक जनसंपर्क आणि विद्यार्थीहितांसाठी त्यांची धडपड दखल घेण्यासारखी असल्याचंही ते म्हणालेत.
राज्य शासनाने कासावार यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान केला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. ही वणीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. संजय खाडे म्हणाले की, कासावार ह्यांनी शिक्षणक्षेत्रांत विविध प्रयोग केलेत. विद्यार्थ्यांसाठी शाळेत व्यायामशाळा सुरू केली. अशा अनेक कार्यांसाठी खाडे ह्यांनी त्यांना याप्रसंगी सदिच्छा देत अभिनंदनही केले.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ह्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या ३९ वर्षांच्या शिक्षकी पेशात त्यांनी एक नवा आदर्श समाजापुढे ठेवल्याचेही ते म्हणालेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कासावार ह्यांनी जागृती केली. विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं कार्य केलं. ते अद्भूतच असल्याचे गौरवोद्गार बोदकुरवार ह्यांनी काढलेत.
या प्रसंगी जवळपास विसाहून अधिक संस्था आणि अनेकांनी त्यांचा व प्रज्ञा ग. कासावार ह्यांचा सपत्निक सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. स्वानंद पुंड ह्यांनी तर संचालन सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी केले. यावेळी शिक्षिका स्नेहलता चुंबळे ह्यांनी “कुंभारासारिखा गुरू नाही रे जगात” हे प्रसंगगीत सादर केले. शिक्षक विजय गंधेवार यांनी स्वरचित गौरवगीत यावेळी गायले. स्वीकृत नगरसेवक रवी बेलुरकर ह्यांनी आभार मानलेत. आयोजक म्हणून आशीष पावडे, सुनील येमुलवार, अनिल येमुलवार, पंकज कासावार, प्रफुल्ल कासावार, साक्षी कासावार, आशीष डंभारे, राजू कासावार, कौशिक खेरा, डॉ. विवेक गौफणे ह्यांनी यशस्वीरीत्या बाजू सांभाळली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. डॉ. दीपक हूड, नरेंद्र मुऱ्हार, डॉ. अतिक सय्यद यांची गीतांची मैफल हे कार्यक्रमाचं आकर्षण ठरलं. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular