माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार पुरस्कृत वणीत केसरी दंगल
१६ वर्षांनंतर वणीत महिला व पुरुषांची भव्य दंगल कुस्ती
सुरेंद्र इखारे वणी :- वणी शहरात दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत जत्रा मैदानावर श्री रंगनाथ स्वामी यांच्या नावाने तब्बल ३७ दिवसांची यात्रा भरते. या जत्रोत्सवानिमित्त पारंपरिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. मात्र दंगल कुस्तीचे आयोजन तब्बल १६ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यानंतर काही कारणास्तव दंगल कुस्ती बंद पडली होती.
यावर्षी मात्र दंगल कुस्ती पुन्हा सुरू करण्यासाठी पैलवान श्री. पांडुरंग लांजेवार यांनी पुढाकार घेतला असून, या उपक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यासंदर्भात शनिवार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ५ वाजता प्राचीन हेमाडपंथी रंगनाथ स्वामी मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत यावर्षी दंगल कुस्तीचे आयोजन करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
या बैठकीत दंगल कुस्तीची तारीख व ठिकाण निश्चित करण्यात आले नसून, पुढील बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार पुरस्कृत ‘माजी आमदार केसरी दंगल कुस्ती’ भरविण्यास बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.
या बैठकीस पांडुरंग लांजेवार, सुरेंद्र ईखारे, प्रमोद निकुरे, फारुख रंगरेज, इरफान शेख, शेख अकील, अशोक निकुरे, मोरेश्वर बॉंडे, विठ्ठल चौधरी, बंडू निंदेकर, बाबुलाल पोटदुखे, जहिर शेख, दिलीप खाडे, संतोष जोशी, सूर्यकांत मोरे,संजय शिवरात्रीवार, जॉन पोन्नलवार, अजय बोबडे, विजय थेरे, रमेश शर्मा, प्रा. दिलीप मालेकर, सुरेश रायपुरे, संदीप जयस्वाल, रमेश बावणे, कनैया पारखी, रमेश येरणे, दीपक पचारे, सुदामा सादवानी, परशुराम पोटे, महादेव दोडके यांच्यासह मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.





