कायरच्या विद्यालयात सामाजिक वणीकरण अंतर्गत “ गणेशमूर्ती प्रदर्शन”
सुरेंद्र इखारे वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात दिनांक 21 सप्टेंबर2026 रोज सोमवारला दुपारी 3.00 वाजता सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वणी अंतर्गत” हरित सेना” इकोक्लब कार्यक्रमांतर्गत “ गणेशमूर्ती प्रदर्शन “ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मधुकर घोडमारे हे होते.प्रमुख मार्गदर्शक सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे वनरक्षक अधिकारी पंकज येवले साहेब तसेच प्रतिभा लाडसे मॅडम,सहायक शिक्षिका सोनाली ठाकूर, रविकांत गोंडलावार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मधुकर घोडमारे यांनी विद्यार्थ्यांना हरितसेनेचे महत्व आणि आवश्यकता कशी आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक पंकज येवले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले सामाजिक वणीकरणातर्फे “ गणेशमूर्ती प्रदर्शन “ घेण्यामागचा उद्देश हा आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे दहा दिवस गोळा केलेल्या निर्माल्यामुळे तसेच गणपतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगामुळे नदी नाल्याचे पाणी दूषित होते पर्यायाने निसर्गाचे नुकसान होते. पुढे ते म्हणाले गणेशमूर्ती ही शाडूच्या मातीने बनवलेली असावी त्याचे विसर्जन घरीच झाडाच्या कुंडीत करावे. घरोघरी गणपती बसवण्याऐवजी एक गाव एक गणपती वर भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत पर्यावरणाचे रक्षण होईल असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी गणेशमूर्ती प्रदर्शनात विद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने प्रथम क्रमांक दिव्या येसेकर, द्वितीय सुमित शंकावार तृतीय वृषभ कोरांगे यांनी पटकावला उपस्थित मान्यवरांचे हस्ते रजिस्टर बुक व बॉलपेन बक्षीस स्वरूपात देण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थी शेजल पारखी, पूर्वी सोनटक्के, स्नेहा निकुरे, नव्या बावणे, अनिकेत शेंडे याना सुद्धा बक्षीस देऊन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार सोनाली ठाकूर यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी सचिन टोंगे, मधुकर कोडापे, आकाश बोरूले यांनी सहकार्य केले.






