संस्कृत जनभाषा बनवूया – श्रीश देवपुजारी
सुरेन्द्र इखारे वणी :- ” ज्ञानभाषा म्हणून विश्व मान्य असलेली, सगळ्या भारताला एका सूत्रात गुंफण्यांची क्षमता असणारी, भारतीय ज्ञानाचा आधार असणारी संस्कृत भाषा आज जागतिक पातळीवर प्रचंड उत्सुकतेचा आणि अनुकरणाचा विषय ठरत आहे. मात्र आपल्यापैकीच अनेकांच्या मनात असणाऱ्या अनेक गैरसमजांमुळे आपण आपल्या या दिव्य वारशाला मुकत आहोत. संस्कृत ही प्रत्येक व्यक्तीची भाषा असल्यामुळे तिला जनभाषा बनवण्यासाठी आपण प्रत्येकाने आपापल्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करायला हवेत.” असे विचार संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख माननीय श्रीश देवपुजारी यांनी व्यक्त केले.
त्यांच्या विदर्भ दौऱ्यात संस्कृत भारतीचे क्षेत्र संघटन मंत्री माननीय संजीव कुमार यांच्यासह वणी येथे आले असताना स्थानिक नगर वाचनालयात वणीतील संस्कृत प्रेमी जनतेला ते संबोधित करीत होते.
संस्कृत केवळ पूजा उपचाराची किंवा मनोरंजक साहित्याची भाषा नसून विश्वातील सर्व प्रकारचे ज्ञान या भाषेत आपल्या स्वतःच्या परिभाषेत व्यक्त करण्यात आलेले आहे. संस्कृत आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील दरी दूर करीत आपल्या या प्राचीन ज्ञान निधीला आपण पुन्हा जागृत करायला हवे. त्यासाठी संस्कृत भारती कटिबद्ध असून संस्कृत विषयात आत्मीयता निर्माण करण्यासाठी, ती क्लिष्ट भाषा आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी संस्कृत भारतीच्या दृष्टीने पायाभूत उपक्रम म्हणून संस्कृत संभाषण शिबिराचे आयोजन करण्यात येते. आपण सगळ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन आपली संस्कृत सोबतची नाळ घट्ट करावी असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
संस्कृत भारती वणी शाखेचे अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत प्रांत गण सदस्या सौ प्रणिता भाकरे यांच्यासह वणीतील संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील विविध गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.