*गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हितोपदेश सुहृद्भेद चे प्रकाशन.*
डॉ. स्वानंद पुंड यांचा ८३ वा ग्रंथ
सुरेंद्र इखारे वणी :- मानवाला पशुत्वातून विकसित करीत दैवी प्रवृत्तीकडे प्रेरित करणारे शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र. नैतिक कथांचा प्राचीन भारतीय विश्वविख्यात संग्रह म्हणजे हितोपदेश.
हितोपदेशाच्या चार प्रकरणांवर लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचे संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड निरुपित आणि पुण्याच्या विश्वविख्यात प्रसाद प्रकाशनाद्वारे प्रकाशित चार ग्रंथांच्या मालिकेतील या दुसऱ्या प्रकरणाचे नाव आहे सुहृद्भेद.
सुहृद अर्थात सुंदर हृदयाचा. मित्र. अशा मित्रांच्या मैत्रीमध्ये दुष्टांनी निर्माण केलेल्या वितुष्टाचा विचार या प्रकरणाच्या मध्यवर्ती कथेचा आशय आहे.
एका कथेतून दुसरी कथा त्यातून तिसरी कथा, पुन्हा मूळ कथा अशी जी हितोपदेशाची वैशिष्ट्यपूर्ण रचना.
पिंगलक नावाचा सिंह, त्याचा संजीवक नावाचा मित्र बैल आणि त्या दोघांमध्ये भेद घडविणारे दमनक आणि करटक हे दोन कोल्हे या कथामालिकेचे प्रधान पात्र आहेत.
त्यांच्या परस्पर संवादातून विविध नऊ कथा आपल्यासमोर उलगडत जातात. जो या ग्रंथाचा विस्तार आहे.
विधी पद्धती अर्थात काय करावे ? आणि निषेध पद्धती म्हणजे काय करू नये ? अशा दोन्ही दृष्टीने यात विविध कथा आलेल्या आहेत. त्यात प्राधान्याने निषेध कथा अर्थात स्वर्णरेखानापितादि कथा आणि गोपीजारद्वय कथा या दोन कथा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.
त्यामध्ये समाजातील निंदनीय कार्य करणाऱ्या महिलांचे वर्णन आहे. त्यावेळी त्यांची निंदा करणारी आलेली वचने केवळ आणि केवळ तशा स्वरूपात विकृत स्त्रियांच्या साठी आहेत हे समजून घेतले तर या कथांचे नेमके अध्ययन शक्य होईल.
“कथा कशी आहे ?यापेक्षा ती तशी का आहे ? हे समजून घ्यायला हवे .” या भूमिकेतून प्रगट होणारा विवेक या कथा आपल्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीने स्पष्ट करतात.
धूर्ततेचे आणि दुष्टतेचे प्रतीक असणारे दमनक आणि करटक, त्यांच्या निमित्ताने दुष्टांच्या मनामध्ये चालणाऱ्या चिंतन विश्वाचा घेतलेला आढावा या सर्व प्रकरणात वारंवार अभ्यासण्याचा विषय आहे.
पिंगलक सिंह त्या जंगलाचा राजा असल्यामुळे त्याच्या निमित्ताने राजनीतिशी संबंधित अनेक विचार येथे पदोपदी प्रगट झालेले आहेत. आता समाजात प्रत्यक्ष राजसत्ता नसली तरी राजा हे सत्तेचे, अधिकाराचे प्रतीक म्हटले तर कोणत्याही क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीच्या दृष्टीने या सर्व चिंतनाचा विचार आजही तितकाच कालोचित आहे. कोणत्याही समूह वा संस्थेतील उच्च पदस्थ व्यक्तीची आणि त्याबद्दल त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांची मानसिकता या दृष्टीने या सर्व विवेचनाचे चिंतन केले तर त्यातील त्रिकालाबाधित्व आपणास रसदायक ठरेल आणि उपयुक्त देखील.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात जीओईसी स्वरूपात विज्ञान आणि वाणिज्य विषयाच्या विद्यार्थ्यांना आणि द्वितीय वर्षात संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा. केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच नाही तर जीवनात नैतिकतेला आणि सद्विचारांना प्राधान्य देणाऱ्या प्रत्येक भारतीय संस्कृती प्रेमी व्यक्तीसाठी ही ग्रंथ मालिका नितांत संग्रह आणि अनुकरणीय आहे.