Friday, April 24, 2026
Google search engine

वणी शहरातील जनगणनेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात

वणी शहरातील जनगणनेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात

सुरेंद्र इखारे वणी:–

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील 16 व्या जनगणनेच्या प्रक्रियेला वणी शहरात सुरुवात झाली आहे. त्यासाठी वणी नगर परिषद अंतर्गत होणाऱ्या जनगणनेसाठी पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाला दिनांक 23 एप्रिलला येथील लायन्स कॉन्व्हेन्ट मध्ये सुरुवात झाली आहे. या प्रसंगी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी डॉ. सचिन गाडे हे होते. अतिथी म्हणून नगर परिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी गजानन कासावार प्रशिक्षक म्हणून मयुरेश केंद्रे व प्रशांत कांबळे उपस्थित होते.
या प्रसंगी जनगणनेचे महत्व समजावून सांगताना डॉ. गाडे म्हणाले की, जनगणना म्हणजे एखाद्या देशातील लोकसंख्येची, त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थितीची अधिकृत नोंद घेण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया देशाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक मानली जाते.
भारतामध्ये जनगणना ही दर १० वर्षांनी केली जाते. भारतात पहिली अधिकृत जनगणना १८७२ साली ब्रिटिश कालावधीत झाली, तर नियमितपणे दहा वर्षीय जनगणना १८८१ पासून सुरू झाली. स्वातंत्र्यानंतरही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना कासावार म्हणाले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्यापुरती मर्यादित नसून ती देशाच्या नियोजनाचा पाया आहे. सरकार विविध योजना आखताना जनगणनेतील आकडेवारीचा आधार घेत असते. उदाहरणार्थ—शिक्षण, आरोग्य, रोजगार, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा यांसाठी किती निधी द्यायचा, कुठे रस्ते, शाळा, रुग्णालये उभारायची, याचे निर्णय जनगणनेवर आधारित असतात. तसेच जनगणनेमुळे देशातील साक्षरतेचे प्रमाण, लिंगानुपात, ग्रामीण-शहरी लोकसंख्या, रोजगाराची स्थिती, स्थलांतर, भाषा आणि धर्म यांची माहिती मिळते. या माहितीच्या आधारे सरकार योग्य धोरणे आखते.
त्यानंतर प्रशिक्षक प्रशांत कांबळे यांनी पहिल्या टप्प्याच्या पहिल्या गटाचे प्रशिक्षणाची रूपरेषा उपस्थिताना समजावून सांगितली. प्रशिक्षक मयुरेश केंद्रे यांनी सांगितले की,देशातील ही पहिली डिजिटल जनगणना आहे. प्रत्येक घरी प्रगणकाने भेट देऊन त्यांना 34 प्रश्न विचारून घरची स्थिती, मालमत्ता व आपल्याकडे उपलब्ध सुविधांची माहिती गोळा करायची आहे. ही माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार आहे. या जनगणनेत प्रत्येक नागरिकांना जनगणनेचा अँप द्वारे स्वयं: जनगणना करता येणार आहे.
वणी शहरातील 14 प्रभागाचे सरासरी 200 घरांचे 125 भागात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक भागात एक प्रगणक असे एकूण 125 प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या 125 प्रगणकावर 20 पर्यवेक्षक राहणार आहेत. या सर्वांचे प्रशिक्षण दिनांक 23 एप्रिल पासून 8 मे पर्यंत 4 बॅच मध्ये होणार आहे. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, अभियंता प्रशांत बळी, निखिल पवार, ऋषिकेश वायदंडे, तांत्रिक सहायक गजानन कापसे परिश्रम घेत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम हापसे यांनी केले. आभार प्रदर्शन धम्मा पाटील यांनी केले. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय जनगणना अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular