Monday, May 25, 2026
Google search engine

रघुवंशम् सप्तम सर्ग प्रकाशित

रघुवंशम् सप्तम सर्ग प्रकाशित
डॉ. स्वानंद गजानन पुंड यांचा ८५ वा ग्रंथ

सुरेंद्र इखारे वणी   :-महाकवी कविकुलगुरू कालिदास विरचित रघुवंशम् महाकाव्य म्हणजे संस्कृत साहित्यसृष्टीची जगाला मिळालेली अनमोल भेट.
या वैभवशाली महाकाव्यावर लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या समर्थ लेखणीतून गेल्या सतत ५७१ दिवसांपासून प्रकाशित होत असलेली ही लेखमालिका आणि तिला जगभरातून प्राप्त होत असलेला अपूर्व प्रतिसाद हा खरोखरच विक्रमी विषय आहे. लेखमालेच्या सलग ५०० भागांच्या प्रकाशनानंतर लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने मालिकेची विक्रम स्वरूपात घेतलेली नोंद मालिकेचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेशी आहे. या मालिकेतील यापूर्वीच्या सहा सर्गांप्रमाणे आज सातव्या सर्गाचे निरूपण पूर्ण झाल्यावर हे संकलन आज ग्रंथरूपात प्रकाशित होत आहे.
हा सातवा सर्ग म्हणजे एका युगपरिवर्तनाचा आरंभबिंदू. राजकुमार अज याचा विवाह संपन्न झाल्यानंतर त्या नवविवाहित दांपत्याचा विदर्भाच्या राजधानीतील प्रवेश, त्यावेळी तेथील स्त्रियांची उडालेली धांदल, गडबडीत त्यांनी केलेल्या अनेक अजब गोष्टी, विवाहाचा संपूर्ण विधी, त्यातील मधुपर्क, लाजाहोम, पाणिग्रहण अशा विविध विधींच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचे स्पष्टीकरण, इतर राजांचे दुःख, त्यांनी नववधूसह निघालेल्या राजकुमारावर केलेले सामुदायिक आक्रमण, दोन्ही सैन्यात झालेले भीषण युद्ध, गंधर्व अस्त्राच्याद्वारे राजकुमार अज याने प्राप्त केलेला विजय , त्यांचे अयोध्येत झालेले स्वागत आणि महाराज रघु यांनी स्वीकारलेला वानप्रस्थाश्रम अशा विविध मनोवेधक घटनांचे सविस्तर वर्णन येथे आले आहे.
हे प्रत्येक वर्णन नितांत रमणीय, रोमांचकारक आणि मुळातूनच वाचावे असे आहे.
हास्य, शृंगार, भयानक , बिभत्स आणि अद्भुत अशा तब्बल पाच रसांची मुक्त उधळण महाकवींनी या सर्गात साधलेली आहे.
नवदांपत्याची वरात विदर्भाच्या राजधानीत प्रवेश करीत असताना ती वरात पाहण्यासाठी नगरातील स्त्रियांची उडालेली धांदल आणि त्यांनी केलेल्या चित्रविचित्र गोष्टी या माध्यमातून हास्य रसाचे अनेक कारंजे महाकवींनी फुलवले आहेत.
विवाहाच्या निमित्ताने, त्यातील विविध प्रसंगांच्या निमित्ताने नववधू-वरांच्या नर्मशृंगाराचा जो पट महाकवींनी विणलेला आहे तो खरोखरच अत्यंत रमणीय आहे आणि वाचता वाचता वाचकांच्या गालावर गुलाब फुलवणारा आहे.
विविध राजांनी एकाच वेळी आक्रमण केल्यानंतर उभय सेनेमध्ये झालेल्या युद्धाचे वर्णन म्हणजे भयानक रसाचे अंगावर काटा आणणारे सादरीकरण. काही वेळा प्रगटलेला बिभत्स रस तर शेवटी गंधर्व अस्त्राच्या प्रयोगाने राजकुमार अज यांनी प्राप्त केलेला विजय म्हणजे अद्भुतरसाचे वर्णन.
वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक रसाचे वर्णन करताना महाकवी अशी काही अलौकिक शब्दरचना करतात की जणू काही हाच त्यांचा आवडता रस असावा आणि सहज वाटून जावे की या रसाचे वर्णन करावे तर ते केवळ महाकवींनीच.
प्रत्येक संस्कृत आणि संस्कृती प्रेमींच्या ग्रंथ संग्रहात असायलाच हवी अशी ही मालिका.

[रघुवंशम् सप्तम सर्ग
विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
अविरत प्रकाशन जळगाव 90288 68953
पृष्ठ संख्या – ८२
मूल्य ( टपाल खर्चासह) ₹- १५०]

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

संपादकीय चमू

सुरेंद्र इखारे
संपादक
94201 2619594201 26195

Today News

Most Popular