डॉ. स्वानंद पुंड यांचा आगळावेगळा विक्रम.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमात १५ संदर्भ ग्रंथ.सुरेंद्र इखारे वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा स्वीकृत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यात संस्कृत अभ्यासक्रमाच्या प्रारूपामध्ये, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी लिहिलेल्या तब्बल १५ ग्रंथांना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून स्थान प्राप्त झाले आहे.
यापैकी नीतिशतकम् हे प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राला, वेदांतसार आणि तर्कसंग्रह हे पदव्युत्तर प्रथम वर्षाला तर तब्बल १० ग्रंथ पदवी स्तरावर द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.
पदवी स्तरावरील द्वितीय वर्षात प्रधान ( मेजर ) आणि सहाय्यक ( मायनर ) अशा दोन स्वरूपात संस्कृत भाषा आणि संस्कृत साहित्य अशा अभ्यासक्रमांमध्ये रघुवंशम् चे एक ते चार खंडांवरील चार ग्रंथ, हितोपदेश चा मित्रलाभ आणि सुहृद्भेद या दोन प्रकरणावरील दोन ग्रंथ तसेच मेघदूतम् आणि रत्नावली यांचा समावेश आहे.
ऐच्छिक सहाय्यक (मायनर इलेक्टिव्ह) या विषयात संस्कृत भाषा विभागात रसास्वाद अन्योक्तींचा तर साहित्य विभागात कवींद्रगाथा हे संदर्भ ग्रंथ म्हणून नोंदविण्यात आले आहेत.
यासोबतच जिओइसी या अभ्यासक्रमांमध्ये व्यवस्थापन सूत्राणि आणि भारतीय स्वयंशिक्षा पद्धती अर्थात श्री अवधूत यदुसंवाद या ग्रंथांचा समावेश करण्यात आलेला आहे.
विद्यापीठाने आरंभी पदव्युत्तर स्तरावर आणि सत्र २०२४-२५ पासून पदवी स्तरावर स्वीकारलेल्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आरंभापासूनच कोणत्या विषयांचा समावेश करायचा याची पूर्वतयारी करून यापैकी दहा पुस्तके त्यांनी गेल्या दोन वर्षात नियोजनबद्ध स्वरूपात तयार केली आहेत हे विशेष उल्लेखनीय.
पुढील वर्षी अंतिम वर्षाचा नवीन अभ्यासक्रम तयार होताना अपेक्षित असणाऱ्या विविध ग्रंथांची रचना देखील आत्तापासूनच सुरू आहे.
पुणे येथील प्रसाद प्रकाशन, जळगाव येथील अविरत प्रकाशन, नागपूर येथील ऋचा प्रकाशन आणि पिंपळापुरे प्रकाशन अशा विविध प्रकाशनांच्याद्वारे हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.




