आत्मनिर्भरतेचे सूत्र देणारे राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक – जयंत त्रिवेदी
सुरेंद्र इखारे वणी :- आज भारताचे पंतप्रधान आ. नरेंद्रजी मोदींनी दिलेला आत्मनिर्भरतेचा नारा ही मुळात तब्बल १०० वर्षांपूर्वी स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण अशा चतुसूत्रीच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी दिलेला होता. समाज सुधारक, पत्रकार, शिक्षण तज्ञ, गणिती, स्वातंत्र्य संग्राम सैनिक अशा प्रत्येकच स्वरूपात त्यांनी केलेले कार्य आजही तितकेच चिंतनीय आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने दूरदृष्टीचे राष्ट्रपुरुष होते. असे विचार लोकमान्य टिळक महाविद्यालयातील कर्मचारी जयंत त्रिवेदी यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझं गाव माझा वक्ता या अभिनव व्याख्यान मालिकेच्या ४७ व्या व्याख्यानात लोकमान्य टिळक एक दूरदृष्टीचा राष्ट्रपुरुष या विषयावर ते व्यक्त होत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ.दिलीप अलोणे तथा विशेष मान्यवर स्वरूपात शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे सहसचिव अशोक सोनटक्के उपस्थित होते.
अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे जयंत त्रिवेदी यांनी हे संपूर्ण व्याख्यान लोकमान्य टिळकांच्या परिवेशात सादर केले.
विसासंघाच्या वणी शाखेच्या वतीने लोकमान्य जयंतीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात नगर वाचनालयाला लोकमान्य टिळक यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
ए मेरे वतन या विजय गंधेवार यांनी सादर केलेली या गीतानंतर विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी प्रास्ताविक केले.
आपल्या प्रभावशाली भाषणामध्ये आपल्याला प्रेरणा देणाऱ्या लोकमान्यांच्या पुतळ्यापासून आरंभ करीत, जीवनातील विविध व्यक्तींचा ऋणनिर्देश करीत लोकमान्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या आधारे जयंत त्रिवेदी यांनी आपले प्रतिपादन साधले. शिर्डीच्या साईबाबा लोकमान्यांची टळलेली अटक आणि त्यांची दूर झालेली बेसनाची एलर्जी हा संदर्भ लोकांना विशेष भावला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये आज वक्त्याने केलेली वेशभूषा म्हणजे नक्कल चा अस्सल पुरावा आहे असे म्हणत ही परकाया प्रवेशाची अवस्था त्यांनी आयुष्यभर जोपासावी असे मत डॉ. दिलीप आलोणे यांनी व्यक्त केले.
आभार प्रदर्शनामध्ये अशोक सोनटक्के यांनी समाजातल्या सर्व घटकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचे कौतुक करीत या स्वरूपात हे प्रयोग महाराष्ट्रभर व्हावेत अशी शुभकामना प्रदान केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सचिव डॉ अभिजित अणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावर यांनी विशेष परीश्रम घेतले.





