तंत्रज्ञानाचा वापर साधन म्हणून करा, व्यसन म्हणून नव्हे! -पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे
नागपूर जयंत साठे :- तंत्रज्ञानाचा वापर साधन म्हणून करा व्यसन म्हणून नव्हे असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, काँग्रेस नगर नागपूर येथील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित विद्यार्थी परिचय कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व विचार प्रवर्तक मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, तुम्हीच भारताचे भविष्य आहात. देशातील लोकसंख्यात्मक लाभ आपल्या बाजूने असताना योग्य वेळी शिक्षणात गुंतवणूक करणे हीच खरी संपत्ती निर्माण करण्याचे साधन आहे. स्वतःच्या ग्रामीण पार्श्वभूमीतील प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना न्यूनगंड बाळगू नये असा सल्ला दिला. नोकरी हेच एकमेव प्रेरणास्थान नसते. प्रेरणा ही रोजची गरज आहे. रोजच्या जीवनात स्वतःला प्रेरित ठेवा हार मानू नका असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता कौशल्य व अध्ययनाला प्राधान्य द्यावे असेही त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता व सोशल मीडियाच्या परिणामावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की तंत्रज्ञानाचा वापर साधन म्हणून करा, व्यसन म्हणून नव्हे! इंटरनेटचा उपयोग शिक्षणाच्या पूरक साधनाप्रमाणे करा, विचलन म्हणून नाही. अपयशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, अपयश आल्यावर खिन्नता येते पण स्वाभाविकही आहे. महत्त्वाचे म्हणजे चुका कुठे झाल्या याचा अभ्यास करून पुढच्या प्रयत्नासाठी स्वतःला सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. क्षमता व प्राविण्य यामधील फरक स्पष्ट करून सांगितले की, प्रत्येक जण शरीराने सक्षम असतो पण सराव व प्रशिक्षणातून खरी प्रगती साधता येत नाही. विद्यार्थ्यांनी सतत शिकत रहावे, जबाबदारी घ्यावी, स्वतःची कहाणी स्वतः लिहावी आणि सदैव गो-गेटर वृत्ती जोपासावी असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ओ. एस. देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ प्रा. डॉ. अतुल बोबडे व डॉ. एस. व्ही. घोनमोडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची सविस्तर ओळख करून दिली. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध साधनसामग्री व संसाधनाची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना या सर्व सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलानंतर विद्यापीठ गीत व स्वागत गीताने झाली. डॉ. एस. व्ही. घोनमोडे यांनी माहिती दिली. त्यानंतर डॉ. व्ही. आर. किन्हीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व शेवटी आभार मानले. दुसऱ्या सत्रात प्राचार्याचे मार्गदर्शन झाले. तिसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व कार्यक्रमामुळे शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण व प्रेरणादायी झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ पी. बी. झामरकर यांनी केले.





