स्वातंत्रालढ्याच्या इतिहासातील वणीच्या जंगल सत्याग्रहाच्या स्मृतींना अभिवादन
४ ऑगस्ट १९३० रोजी झालेल्या ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाची स्मृती; स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला उजाळा
सुरेंद्र इखारे वणी :–
स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या वणी येथील जंगल सत्याग्रहाच्या स्मृतींना ४ ऑगस्ट रोजी अभिवादन करण्यात आले. ४ ऑगस्ट १९३० रोजी वणी परिसरात झालेल्या या जंगल सत्याग्रहाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तालुका संघचालक हरिहर भागवत, अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य गजानन कासावार, विवेक पांडे आणि सुनील इंदुवामन ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
वणीच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात जंगल सत्याग्रहाला विशेष स्थान आहे. लोकनायक पद्मविभूषण डॉ. मा. श्री. उर्फ बापूजी अणे यांच्या प्रेरणेने या आंदोलनाला दिशा मिळाली होती. वणीचे स्व. रा. गं. भागवत आणि चंद्रपूरचे डॉ. शंकरराव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात वणी तालुका काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष स्व. रवी करंदीकर वकील यांच्यासह स्व. डॉ. या. श्री. अणे, स्व. भ. रा. सास्तीकर, स्व. गो. मु. अनुरकर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या जंगल सत्याग्रहात दा. प्र. किटकुले, जयरामपंत इंगोळे, शामरावजी पांडे, नरसुजी ढवळे, व. पां. सैनिस, दौलतराव कळसकार, शंकरराव मारोटकर, बापुराव कापर्तीवार, नारायणराव उपाध्ये, प्रल्हादपंत देशपांडे, मु. वि. देशपांडे, नत्थुजी पानसरे, त्रिंबकराव देशपांडे, सत्यनारायण मिश्रा, मोहनलाल चोपडा, रा. ना. वैद्य, पां. का. पाटील, ग. कृ. ठाकरे, वसंतराव क्षीरसागर, यादवराव कमाविसदार, वामनराव देशपांडे, शंकरराव देशपांडे, माधवराव, कृष्णराव नागदेव, सांबशिव वंगाले, शंकरराव मगरे आदी स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेतला होता.
या ऐतिहासिक लढ्याच्या स्मृती जतन करण्यासाठी वणी तालुका स्वातंत्र्यसंग्राम सैनिक समितीच्या वतीने स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. या स्मृतिस्तंभाचे उद्घाटन ४ ऑगस्ट १९९२ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी ना. रा. भागवत, ब. ना. बोनगीरवार यांच्यासह स्वातंत्र्यसंग्राम सैनिक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठेवा आहे. जंगल सत्याग्रहाच्या स्मृतिस्तंभाला अभिवादन करताना उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि देशभक्तीचे स्मरण केले. ऐतिहासिक वारसा जपणे आणि नव्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी डॉ. जिनेंद्र भंडारी, सागर जाधव, अंकुश भंडारी, प्रामुख्याने उपस्थित होते.





