तेजापूर येथील स्व. विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालयात वन्यजीव सप्ताह संपन्न
मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले
सुरेंद्र इखारे वणी – तेजापूर येथील स्व. विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय येथे वनविभागाच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताह’ व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच चंद्रभागा सहारे या होत्या. प्रमुख अतिथी वनपाल चतारे , मुख्याध्यापक प्रकाश गारघाटे, जिल्हा परिषद शाळा तेजापूरचे मुख्याध्यापक सिसले, भैयाभाऊ भोयर, गजानन मालेकार, आशिष मालेकार, अशु पानघाटे, सचिन पिंपळकर उपस्थिती होते.
याप्रसंगी वनविभागाचे वनरक्षक बोबडे, कतुरे, वाघ, मुत्तलवार, दुर्गे, तोटेवाड, कोडापे यांनी विशेष उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. वन्यजीव सप्ताह आणि सेवा संकल्प अभियानाचे औचित्य साधून आयोजित या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कल्पक कुंचल्यातून निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाचा सुंदर संदेश दिला. स्पर्धेतील उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी वनपाल चतारे यांनी वन्यजीवांचे मानवी जीवनातील संतुलन राखण्यासाठीचे महत्त्व विशद केले. तसेच अध्यक्षीय भाषणात माजी सरपंच चंद्रभागा सहारे यांनी, “विद्यार्थ्यांनी झाडे व जंगलांचे रक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी जनजागृती ग्रामीण भागासाठी महत्त्वाची आहे,” असे मत व्यक्त केले. मुख्याध्यापक प्रकाश गारघाटे व जि. प. शाळेचे मुख्याध्यापक सिसले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वनविभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयन नंदुरकर यांनी केले. आभार तृप्ती चहारे यांनी मानले .
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.





