राष्ट्रीय शिक्षण धोरण हे प्रामुख्याने विद्यार्थीकेंद्री – प्रा. आनंद हूड
नवनवीन आव्हानांना सामोरे जाणारे नवीन शैक्षणिक धोरण
सुरेंद्र इखारे वणी :- ” राष्ट्रीय शिक्षण धोरण अत्यंत व्यापक संकल्पना असून त्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि मूलगामी बदल अपेक्षित आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत शिक्षक किंवा साधन केंद्री असणारी संरचना आता विशेषत्वाने विद्यार्थी केंद्री स्वरूपात प्रस्तावित आहे. राष्ट्राच्या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे त्या राष्ट्रातील संपन्न असे मानवी संसाधन. देशाच्या विकासाला हातभार लावणारी स्वयंपूर्ण आणि राष्ट्रभक्ती प्रेरित स्वाभिमानी नवीन पिढी घडवणे हे या धोरणाचे मूळ उद्दिष्ट आहे. ” असे विचार लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे अधिव्याख्याता तथा राष्ट्रीय शिक्षण धोरण शालेय स्तरावरील समंत्रक प्रा. आनंद अनिल हूड यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगरवाचनालय वणीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझं गाव माझा वक्ता या अभिनव व्याख्यान मालिकेच्या ४३ व्या पुष्पात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शालेय स्तर या विषयावर ते व्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे वणी शाखेचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे तथा प्रमुख अतिथी स्वरूपात नगर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार उपस्थित होते.
माधव सरपटवार यांनी प्रास्ताविकामध्ये साहित्य आणि जीवनाच्या सहसंबंधावर प्रकाश टाकत व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य अधोरेखित केले.
योगायोगाने प्रा. हूड यांचा वाढदिवस असल्याने दोन्ही संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आल्यावर आपल्या सुमारे सव्वा तासाच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विवेचनामध्ये त्यांनी या धोरणाचा इतिहास, त्यात अपेक्षित प्रमुख पाच स्तंभ, वेगवेगळ्या टप्प्यांवर होणारे कार्यान्वयन, कौशल्य आणि चारित्र्य निर्मिती विषयीची भूमिका, मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल, निरंतर प्रक्रिया, पंचकोशीय विकास अशा विविध विषयांवर सविस्तर प्रकाश टाकून भारतीय संस्कृतीवर होणाऱ्या पाश्चात्य आक्रमणाच्या भीषणते विषयी चिंता व्यक्त करीत त्यावर उपाय स्वरूपात हे शिक्षण धोरण आखण्यात आल्याचे अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. दिलीप अलोणे यांनी शालेय जीवनात पाठ केलेल्या अनेक गोष्टींचा आयुष्यात नेमका काहीच उपयोग झाला नाही याची खंत मांडत नवीन धोरणात या गोष्टी दुरुस्त होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ वणी चे सचिव डॉ अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष गजानन कासावार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे, राम मेंगावार आणि देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.