कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयावर वज्राघात!
कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांचे सपत्नीक रस्ते अपघातात दुःखद निधन-: नागपूर, जयंत साठे :- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे सन्माननीय कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांचा मऊ कुशीनगर उत्तरप्रदेश येथे जात असताना आज पहाटे दि. 23 आॅगस्ट 2025 रोजी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासह त्यांची पत्नी श्रीमती बदामी त्रिपाठी यांचाही दुर्दैवी अंत झाला. तसेच त्यांचा चालक श्री वैभव मिश्रा हा गंभीर असून तो हाॅस्पिटलमध्ये आहे. मा. कुलगुरू महोदयांच्या सपत्नीक निधनाने संपूर्ण कालिदास संस्कृत विश्वविद्यालय परिवारावर वज्राघात झाला असून ही घटना परिवारासाठी धक्कादायक आहे.
प्रो. हरेराम त्रिपाठी हे भारतीय दर्शनशास्त्र, नव्यन्याय, सांख्ययोग, न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान् व दार्शनिक होते. त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरूपदाची सूत्रे दि. 7 जून 2023 रोजी स्वीकारली. दोन वर्षांच्या कार्यकाळात विश्वविद्यालयाच्या विकासासाठी आतापर्यंत 70 कोटी अनुदान तसेच संशोधन प्रकल्प व विविध कार्यशाळा, सेमिनार, परिषदांकरिता अनुदान प्राप्त करून दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात वारंगा आंतरराष्ट्रीय परिसराच्या डाॅ. हेडगेवार शैक्षणिक भवनाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्राी श्री देवेंन्द फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते 1 आॅेगस्ट 2025 रोजी संपन्न झाले. याशिवाय संशोधन छात्रावास, डाॅ. तोतडे सभागृह देखील त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. अगदी कालच 6 प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे पत्र त्यांनी विशेषत्वाने बोलावून सगळ्यांना दिले होते.
त्यांना संस्कृत क्षेत्रातील विविध प्रशासकीय व शैक्षणिक कार्याचा दांडगा अनुभव होतो. प्रो. त्रिपाठी हे श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली येथे भारतीय दर्शनशास्त्राचे प्रोफेसर होते. त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरूपदही भूषविले होते. सतत कार्यमग्न असलेल्या व विविध संस्थांमध्ये कार्य करण्याचा अनुभव असलेल्या प्रो. त्रिपाठी यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रो त्रिपाठी यांना संस्कृत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाकरिता भारत सरकारतर्फे महर्षी बादरायण राष्ट्रपती पुरस्कार, शांकर वेदान्त पुरस्कार, पाणिनी सम्मान तसेच उत्तर प्रदेश संस्कृत संस्थानचा विशिष्ट सेवा पुरस्कारासह अनेकानेक सन्मान प्राप्त झाले होते.
त्यांच्या अनपेक्षित व धक्कादायक निधनाने संस्कृत क्षेत्राची मोठीच हानी झाली असल्याची प्रतिक्रिया संस्कृत तसेच भारतातील मान्यवरांनी व्यक्त केली असून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मा कुलगुरू महोदयांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल मा श्री सी पी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री मा. श्री नितीनजी गडकरी, नागपूर चे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शोक व्यक्त केला आहे.




